■■ (२) सिध्दीटेकचा सिध्दीविनायक ■■
श्री सिध्दिविनायक, सिध्दटेक
स्थितो भीमातीरे जगदवनकामेन हरिणा ।
विजेतु दैत्य तच्छुति मलभवौ कैटभमधू ।।
महाविघ्नार्तेन प्रखर सेवितपदो ।
गणेश सिद्धिशो गिरिवरवपु: पंचजनक ।।२।।
अर्थात - संकटात सापडलेल्या श्री विष्णुने भीमनदीच्या तीरावर असलेल्या पर्वतश्रेष्ठ समजल्या जाणा-या सिद्धटेक पर्वतावर, हिरव्यागार वृक्षराईत बसून कडक तपश्चर्या करून, पंचमहाभूतांचे जनक असलेल्या सिद्धेश्वर गणेशाकडून वर मिळवला व मधू, कैटभ या दैत्यांना यमसदनी पाठवले. अशा या सिद्धेश्वराच्या चरणी माझी सेवा रूजू असू दे.
भिमा नदीच्या तिरावर नगर जिह्यातील अष्टविनायकाचे एकमेव स्थान म्हणजे सिध्दटेकचा श्री सिध्दीविनायक. श्री सिध्दीविनायकाचे मंदीर लहानश्या टेकडीवर असून उत्तराभिमुख आहे. मंदीरास नगारखानायुक्त महारद्वार आहे. नगारखाना पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके यांच्या स्मरणार्थ बांधला आहे. मंदीराचा सभामंडप बडोद्याचे दानशुर भाविक नारायण मैराळ यांनी बांधलेला आहे. तर गाभारा अहिल्याबाई होळकरांने बांधला आहे. गाभा-यात दगडी सिहासनावर पितळी मखर असून त्यामध्ये श्री सिध्दिविनायकाची अष्टविनायकातील एकमेव उजव्या सोंडेची उत्तराभिमुखी तीन फूट उंच व अडीच फूट रुंद, स्वयंभू मुर्ती विराजमान झालेली आहे.
श्री सिध्दीविनायक मंदीरापासून जवळच एक पवित्र स्थान आहे. तेथे महर्षी व्यास यांनी यज्ञ व तपश्चर्या केली होती. तसेच या ठिकाणी केडगावचे प्रसिध्द संत नारायण महाराज व मोरया गोसावी यांनीही तपसाधना केली होती. सिध्दटेक जवळ स्थापत्य केलेल्या अविष्काराने आश्चर्यचकित करणारे राशिन नावाचे ठीकाण आहे. तेथील जगदंबा मंदीरात दोन दिपमाळा आहेत. त्यातील एका दिपमाळेत आत जाऊन लाकडी दांडा हलवला की, त्या दिपमाळाही हलतात.
श्री सिध्दीविनायक आणि सिध्दटेक या नावांच्या उत्पत्ती विषयी असे सांगितले जाते की, ब्रम्हदेव सृष्टीनिर्माण करीत असताना भगवान विष्णूंच्या कानातून ते गाढ निद्रेत असताना मधू व कैटभ हे दोन दैत्य निर्माण झाले त्यांनी ब्रम्हदेवाच्या कार्यात वारंवार अडथळे आणण्यास सुरूवात केली. सारी पृथ्वी भयभीत झाली. तेव्हा देवांनी विष्णूला जागे केले विष्णूने मधू - कैटभांशी घनघोर युध्द आरंभले. परंन्तू काही केल्या विष्णूला यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा भगवान विष्णू शंकरास शरण गेले. शंकरानी त्यांना, “युध्दारंभी गणेशाचे स्तवन केले नसल्यामुळे तुला यशप्राप्ती होत नाही .” असे सांगितले. तेव्हा विष्णूने एका टेकडीवर “श्री गणेशाय नमः” या षडाक्षर मंत्राने गणेशाची आराधना केली. त्या तपश्चर्येने प्रसंन्न होऊन गणेशाने विष्णूस सिध्दी दिली. मग सिध्दीच्या जोरावर विष्णूने मधू कैटभाचा वध केला. ज्याठीकाणी विष्णूंना सिध्दी प्राप्त झाली त्या ठीकाणी त्यांनी गंडकी शिलेच्या विनायक मुर्तीची स्थापना करून मोठे मंदीर बांधले. या ठीकाणी विष्णूची कार्यसिध्दी झाली, म्हणून हे स्थान सिध्दटेक व गणेश सिध्दीविनायक म्हणून ओळखले जाऊ लागले.
जाण्याचा मार्ग :
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात
सिध्दटेक येथे हे मंदिर आहे. पुण्यापासून अंदाजे ९९ किलोमीटरवर देऊळ आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा