संत नरहरी सोनार
◆◆◆ संत शिरोमणी नरहरी सोनार ◆◆◆
यादव कालीन वारकरी संप्रदायात नामदेव शिंपी, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, दासी जनी, सोहिरोबा,गणिका कान्होपात्रा,चोखोबा,सेना न्हावी असे अठरापगड जातीमध्ये जन्म घेतलेले संत होवून गेले. अशा संतानी आपापल्या भक्ती मार्गाने वारकरी संप्रदायाची,भागवत धर्माची पताका सतत फडकत ठेवली.आपापले पारंपारिक व्यवसाय सांभाळून व आपला संसार करता करता या संतानी पांडुरंगाचे नामस्मरण केले.या संतांपैकी एक श्री संत शिरोमणी नरहरी सोनार हे व्यवसायाने सोनार असलेले एक महान संत होते व त्यांनी आपल्या भक्तीचा वेगळा ठसा जनमानसावर उमटवला होता. प्रारंभी संत नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त होते.परंपरेने त्यांच्या घरात ही शिवभक्ती चालत आली होती.भगवान शंकरावर त्यांची एकनिष्ठ भक्ती होती.त्यांच्या या शंकर भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होत होती.रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असत.रोज भल्या पहाटे जोतिर्लिंगावर बेल पत्र वाहिल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू व्हायचा नाही.आपल्या अशाच एका शिवस्तुतीपर अभंगात ते म्हणतात-
भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर ।
तेथें मी पामर काय वर्णू ॥ १ ॥
भूषण जयाचें भुवना वेगळें ।
रुंडमाळा खेळे गळ्यामध्यें ॥ २ ॥
कर्पुरगौर भोळा सांब सदाशिव ।
भूषण धवल विभूतीचें ॥ ३ ॥
माथां जटाभार हातीं तो त्रिशूळ ।
श्वेत शंख बळें फुंकीतसे ॥ ४ ॥
भांग जो सेवूनी सदा नग्न बैसे ।
जटेंतूनि वाहे गंगाजळ ॥ ५ ॥
गोदडी घालूनी स्मशानीं जो राहे ।
पंच वस्त्र होय श्रेष्ठ भाग ॥ ६ ॥
नाम घेतां ज्याचे पाप ताप जाती ।
पापी उद्धरती क्षणमात्रें ॥ ७ ॥
नरहरी सोनार भक्ति प्रियकर ।
पार्वती शंकर ह्रदयीं ध्यातो ॥ ८ ॥
सुरुवातीच्या काळात नरहरी सोनार कट्टर शिवभक्त
असल्यामुळे इत्तर दुस-या कोणत्याही देवांवर त्यांची
बिलकूल श्रध्दा नव्हती.त्यांच्या या दुसऱ्या देवाबद्दलच्या
वृत्तीचा त्या काळी बऱ्याच जणांना राग यायचा.असे
म्हणतात की, एक दिवस खुद्द पांडुरंगानेच या
शिवभक्ताची परीक्षा घ्यायचे ठरवले.पंढरपुरात एका सावकाराला बऱ्याच नवससायासाने पुत्रप्राप्ती झाली होती.त्याच्या नवसपूर्तीसाठी त्याने विठ्ठलाला एक मौल्यवान कलाकुसर असलेली सोन्याची साखळी तयार करून घालायचे ठरवले.पंढरपुरात संत नरहरी सोनार हे सुवर्णकामातले एक उत्कृष्ट कारागीर होते.त्यांची कलाकुसर पंचक्रोशीत अत्यंत प्रसिध्द होती,त्यामुळे हे काम त्या सावकाराने संत नरहरी सोनारांना सांगितले. ‘आपण फक्त शंकराची भक्ती करतो आणि शंकराशिवाय कोणत्याही देवाचे तोंड आपण बघणार नाही’ हे कारण सांगून सोनसाखळी तयार करायला
नरहरी सोनार यांनी साफ नकार दिला. हे काम नरहरी यांच्याकडूनच करून घ्यायचे असा सावकाराचा हट्ट होता.नरहरी सोनारांकडून त्यांनी विठ्ठलाचे तोंड न दाखवता ही साखळी घडवून घ्यायचे ठरवले त्यासाठी सावकाराने विठ्ठलाच्या कमरेचे माप स्वत: आणून देण्याचे कबूल केले तेंव्हा एकदाचे संत नरहरी सोनार यांनी ती सुवर्णसाखळी बनवण्याचे मान्य केले.दुस-या दिवशी सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप
स्वत: त्यांना आणून दिले.संत नरहरी यांनी आपली सर्व कलात्मकता पणाला लावून एक सुंदर सोनसाखळी
तयार केली.सावकार ती अप्रतिम सोनसाखळी पाहून
खूपच खुश झाला.तात्काळ त्याने मंदिरात जाऊन
स्वत:च्या हाताने विठ्ठलाला ती सोनसाखळी घालायाचे
ठरवले व मंदिरात गेला.तो साखळी घालायला
लागल्यावर त्याच्या लक्षात आले की सोनसाखळी
विठ्ठलाच्या कामरेपेक्षा वीतभर मोठी झाली आहे.
सावकाराने पुन्हा माप घेवून आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे साखळीचे माप बरोबर करून आणण्यास पाठवले.असे कसे झाले असा विचार करत संत नरहरी सोनार यांनी साखळी नवीन मापाप्रमाणे दुरुस्ती करून दिली.सावकाराने पुन्हा विठठलाला
साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झालेले आढळले.
हे पाहून संत नरहरी सोनार पुरते गोंधळून गेले.माप
बरोबर घेवूनही असे कसे झाले या विचारात पडले.
शेवटी त्यांनी स्वत:च माप घ्यायचे ठरवले त्यासाठी ते
नाईलाजास्तव डोळ्यावर पट्टी बांधून मंदिरात
विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले.विठ्ठलाच्या कमरेला
सोनसाखळी घालायला कमरेला हात लावला तर
त्यांच्या हाताला व्याघ्रचर्मे जाणवली. सोनारांचे हात
गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे
जाणवले. नरहरी सोनारांनी आपल्या डोळ्यावरील पट्टी
काढली बघतात तर काय समोर सावळ्या विठ्ठलाचीच
मूर्ती होती.पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत
पुन्हा तेच झाले यामुळे ते खूपच गोधळून गेले.शेवटी
त्यांना आत्मज्ञान होवून त्यांच्या लक्षात आले की
पांडुरंग परमात्माच भोलानाथ शंकर आहे.ईश्वर एकच
आहे.सगळे देव विठ्ठलातच सामावलेले आहेत.पुढे
आपल्या भक्तीने ज्ञानदेवांनी जी शैव आणि वैष्णव
यांच्यामधील एकात्मतेची अपेक्षा केली , ती नरहरी
महाराजांनी प्रत्यक्ष आपल्या आचरणाद्वारे पूर्ण केली.या
' कटिसूत्र ' प्रसंगानंतर ते वारकरी (विठ्ठलोपासक)
झाले, कारण त्यांना शिव आणि विष्णू यांच्यामधील
अभेद जाणवला यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये पुरते
बुडून गेले.आपल्या अभंगात ते म्हणतात-
देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ॥ १ ॥
देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोनें ॥ २ ॥
त्रिगुणाची करुनी मूस । आंत ओतिला ब्रह्मरस ॥ ३ ॥
जीव शिव करुनी फुंकी । रात्रंदिवस ठोकाठोकी ॥ ४ ॥
विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केला चूर्ण ॥ ५ ॥
मनबुद्धीची कातरी । रामनाम सोनें चोरी ॥ ६ ॥
ज्ञान ताजवा घेउन हातीं । दोन्ही अक्षरें जोखिती ॥ ७ ॥
खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पैलथडी ॥ ८ ॥
नरहरी सोनार हरीचा दास । भजन करी रात्रंदिवस ॥ ९ ॥
' देवा , मी तुझा सोनार आहे , आणि मी नेहमी तुझ्या नामाचाच व्यवहार करीत असतो. फुललेल्या निखाऱ्यांची शेगडी-बागेसरी म्हणजे माझा देह आहे. त्यात जीवाशिवाचं सोनं घातलेलं आहे.
सत्त्व, रज , तम या तीन गुणांची मूस मी तयार केली
आहे आणि त्यात ब्रह्मारस ओतला आहे. जीवाशिवाच्या फुंकणीनं मी या धगधगत्या आगीत , ती
शिलगावण्यासाठी, फुंक मारतो आहे. म्हणून त्यात माझ्या अंतरात्म्याचं सोनं तावून-सुलाखून निघतं आहे.
त्या तप्त झालेल्या सुवर्णाला रात्रं-दिवस , ठोकाठोकी करून मी आकार द्यायचा प्रयत्न करतो आहे. '
संत नरहरी सोनाराच्या नावावर तसे फारच थोडे अभंग
उपलब्ध आहेत. ' सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई ' ' शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा' माझे प्रेम तुझे पायी ' आणि देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार ' अभंग
प्रसिद्ध आहेत. संत नरहरी सोनार म्हणतात , आपण
आपले तन-मन-धन अर्पून स्वीकारलेले काम निष्ठापूर्वक
केले , तर यश , कीतीर् , वैभव आपल्या पायाशी लोळण
घेणारच आहे. म्हणूनच ' यात अर्थ नाही , त्यात अर्थ
नाही ' असे म्हणत बसण्यापेक्षा जे काम स्वीकारले
आहे , त्यालाच दिव्यत्वापर्यंत नेण्याची शिकवण त्यांनी आपल्या अभंगातून दिली.
काहीं करीना उपाय । दिवसें दिवस व्यर्थ जाय ॥ १ ॥
संसारीं नाहीं समाधान । न चुकती जन्ममरण ॥ २ ॥
शेण लोणी सोनें कांसें । एक मोले विके कैसें ॥ ३ ॥
दुर्जनसंग त्यागावा । संतसंग तो धरावा ॥ ४ ॥
नरहरी जोडोनियां कर । उभा सेवे निरंतर ॥ ५ ॥
असा कर्मयोगातून मोक्षाप्रत जाणारा भक्तीमार्ग त्यांनी लोकांना सांगितला.अशा या कर्मयोगी संत नरहरी सोनार यांना शत् शत् वंदन........
रामकृष्ण हरी ........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा