आषाढी एकादशी
महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर, तुकाराम या महान संताशी एकादशीचा अतूट संबंध जोडला गेलेला आहे. एकादशीच्या आधी सुमारे वीस दिवस आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून तर देहुहून संत तुकाराम महाराजांची पालखी दिंडी बरोबर चालत पंढरपूरला नेतात. महाराष्ट्रातला सर्वात मोठया प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. आषाढी एकादशीला - म्हणजेच आषाढ शुध्द एकादशीला सर्व भक्तगण पंढरपूरला विठोबा-रखुमाईचे दर्शन घेतात आणि द्वादशीला आपापल्या गावी परततात. या दोन महत्त्वाच्या पालख्यांबरोबरच संत ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ संत सोपानदेव यांची पालखीही सासवड येथून निघून पंढरपूरकडे रवाना होते.
महाराष्ट्रातील तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोचलेला हा सांस्कृतिक वारसा आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमीला देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे तर ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपुरासाठी प्रस्थान ठेवण्यात येते. पालखीमध्ये ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या चांदीच्या पादुका पूजा करून ठेवल्या जातात. ज्ञानेश्वरांचा उल्लेख 'माऊली' असा केला जातो. पालख्यांच्याबरोबर मानाचे अश्वही या दिंडीत सामील होतात. पालख्यांच्या या सोहळयात रंगलेल्या भक्तांना 'वारकरी' या नावाने संबोधले जाते. वारकरी हा भक्तीत गुंग, सदाचारी, निर्व्यसनी असतो अशी श्रध्दा आहे. विशेषत: गळयात तुळशी माळा घालून कपाळी गंधाचा टिळा लावून, मद्य किंवा मांसाहार करणे अत्यंत निशिध्द मानले गेल्यामुळे 'माळकरी' वारकरी सात्विक आहे हा पक्का समज असतो.
पूर्वी जातीय व्यवस्थेवर आधारित असे भक्तांचे समूह केले जात आणि त्यांना विशिष्ट क्रमांक दिले जात. त्या समूहांना 'दिंडी' असे म्हणतात. या सोहळयात सहभागी होणारे भक्तजन आपापल्या दिंडीत एकत्र राहून पंढरपूरपर्यंत पायीपायी चालत जातात. आता मात्र नव्या दिंडया जातीय व्यवस्थेवर आधारित नाहीत. प्रत्येक दिंडीचा प्रमुख एक 'वीणेकरी' असतो. वीणेकरी म्हणजे ज्याच्या गळयात वीणा असते तो. एका दिंडीला एकच वीणेकरी असतो. वीणेक-यानंतर टाळकरींचा मान असतो. प्रत्येक दिंडीचे ५ ते १० पर्यंत ध्वज असतात. ते ध्वज कावेने रंगविलेले असतात. दिंडीमध्ये प्रामुख्याने बहुजन समाज, शेतकरी वर्ग आणि आजकाल सुखवस्तू पांढरपेषा लोकही थोडयाबहुत संख्येने सामील होतात. स्त्री-पुरुष , काहीवेळा अख्खे कुटुंबच्या कुटुंबही दिंडीत सहभागी होते. साधारणत: धोतर किंवा पायजमा, सदरा,गांधी टोपी असा पुरुषांचा तर नऊवारी साडया असा स्त्रीयांचा पोषाख असतो. ज्या स्त्रिया काही नवस बोललेल्या असतात त्या नवस फेडण्यासाठी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालत जातात. कपाळी बुक्का किंवा चंदनाचा टिळा, हातात झांजा किंवा एकतारी, गळयात तुळशीच्या माळा, मुखी विठ्ठलाचे नाम, ज्ञानेश्वरांच्या ओव्या किंवा तुकारामांचे अभंग, भक्तीरसात न्हालेले मन आणि ऊन-पाऊस-वादळ-वारा यांना न जुमानता विठुरायाच्या ओढीने पायी अंतर पार करण्यासाठी आसुसलेली पावले असे हे जनताजनार्दनाचे रुपडे असते.
'चाले हे शरीर कोणाचिये सत्ते,
कोण बोलविते हरीविण,
देखवी दाखवी एक नारायण,
तयाचे भजन चुको नका '
या समर्पक ओवीच्या आविर्भावात चेह-यावर प्रवासाचा शीण जराही उमटू न देता वारकरी दिंडीबरोबर चालत रहातात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा