◆◆◆ चाहूल गणपतीच्या आगमनाची ◆◆◆

ओढ ढोलताशांच्या गजराची..
ओढ मंगलमूर्तीच्या रुपाची..
ओढ बाप्पाच्या आशीर्वादाची..
ओढ गणरायाच्या आगमनाची..
ज्यांच्या आगमनाची भक्तगण वर्षभर डोळ्यात प्राण आणून वाट पाहतात त्या १४ कला आणि ६४ विद्येच्या अधिपतींचे आगमन आता पाच दिवसावर येऊन ठेपले आहे. घरगुती गणपती, सार्वजनिक गणपतीच्या स्वागताची जय्यत तयारी सगळीकडे सुरु आहे. शुक्रवार पासून अवघ्या महाराष्ट्रात गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष दुमदुमणार आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली असून गणेशोत्सवाच्या उत्साहाची लाट महाराष्ट्रभर पसरली आहे. सगळीकडे लाडक्या गणरायाच्या आगमनाचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
जसजशी गणेश चतुर्थी जवळ येत आहे तसतशी सगळीकडे श्रींच्या आगमनाची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे आणि यात मूर्तिकारही मागे नाहीत, मूर्ती बनविण्याचे महत्वाचे काम पूर्णत्वाला आले आहे. गणेशमूर्तीही गणेशभक्तांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. काळाप्रमाणे देवाचे बदलते स्वरूप सर्वत्र पाहायला मिळत आहे. देवाचे रूप बदलले पण भक्तांच्या मनातील बाप्पाबद्दलची आत्मीयता, भक्ती आणि आदर तसूभरही कमी होताना दिसत नाही.
महाराष्ट्रातील शहरं गर्दीनं फुलली आहेत. गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी पूजा व सजावटीच्या साहित्य खरेदीकरिता भाविकांची बाजारपेठेत झुंबड उडाली आहे. विविध गणेश मंडळांच्या आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीमुळे रस्ते गजबजले दिसत आहेत. हल्ली विसर्जन मिरवणुकी इतकेच आगमन सोहळ्याच्या मिरवणुकींना वेगळे महत्व आलेले आहे. उत्सवाचे रूप जसे हळूहळू बदलत आहे तसेच ते लोकप्रियही होताना दिसत आहे. गणेशाच्या स्वागतासाठी बाजारपेठांमध्येही एकप्रकारचे चैतन्य सळसळते. विविधांगी आकर्षक गणेशमूर्ती भाविकांना भुरळ घालतात. मूर्तीसोबतच मखर आणि सजावटीसाठी विविध वस्तूंची खरेदी
सध्या जोरावर आहे.
डीजेच्या तालावर थिरकणारी पावलं आता ढोलताशाच्या गजरात संस्कृती जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. बऱ्याच मंडळांकडून हल्ली डीजेपेक्षा ढोलताशांची मागणी वाढली आहे. अनेक नामवंत ढोलपथक गणरायाच्या स्वागताची कसून तयारी करताना दिसत आहेत. ढोलताशांच्या गजरात आपल्या भक्तांचे दुःख हरण्यासाठी गणपती बाप्पांची स्वारी महाराष्ट्रात दाखल होईल आणि सारा आसमंत भक्तीमय होईल. सध्याचा गणेशोत्सव डिजिटल झाला आहे, गणपती महतीच्या अॅपपासून ते पूजेच्या, आरतीच्या अॅप प्रत्येकाच्या मोबाईलवर आरूढ झाल्या आहेत. यावरून लक्षात येते की ‘अॅपला’ गणेशोत्सव सध्याच्या डिजिटल युगातही तितकाच लोकप्रिय आहे.
लोकमान्य टिळकांनी देव्हाऱ्यातील गणपतीला लोकहितार्थ सार्वजनिक स्वरूप दिले ते त्याकाळी विखुरलेल्या, जातीपातींमध्ये गुरफटून पडलेल्या जनतेमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी जागृती निर्माण करण्यासाठी. सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या टिळकांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही म्हणून आजही सार्वजनिक मंडळांमध्ये टिळकांचा फोटो आपणाला गणेश मंडपांच्या प्रवेशद्वाराशी पहावयास मिळतो. समाजप्रबोधनाच्या हेतूपुरस्सर अनेक मंडळे देखावे उभारतात आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडतात. गणेशोत्सवाचा हा मूळ उद्देश जपणाऱ्या मंडळांनी आजही चलचित्रांमधून, देखाव्यांमधून समाज प्रबोधनाची कास धरलेली आहे. अनेक मंडळातून सामाजिक, सांकृतिक परंपरा जपणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
दुष्काळाचे सावट, महागाईच्या भस्मासुर अशा संकटांचा सामना करत भक्तगण विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी आतुर आहेत. आपापली दुःख, विवंचना बाजूला ठेऊन पुढील ११ दिवस आणि रात्रसुद्धा अवघा महाराष्ट्र गणरायाच्या सेवेत लीन होणार आहे. आपल्या लाडक्या देवाची भक्तीभावाने सेवा करताना महाराष्ट्रातील तमाम भक्त भूकतहान विसरून गणरायाच्या आराधनेत मंत्रमुग्ध होतील. भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या या गणरायाकडे महाराष्ट्राचं एकंच मागणं -
तुझ्या आगमनासाठी गजबजला महाराष्ट्र सारा,
तुझ्या भक्तीच्या सुरात सूर मिसळून वाहील वारा..
तुझ्या येण्याने सारी विघ्न दूर सरू दे मोरया,
जमलंच तर येताना थोडा पाऊस घेऊन ये गणराया!!
  गणपती बाप्पा मोरया !!!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत नामदेव महाराज पुण्यतिथी