मंगळागौर

जागवूया मंगळागौर ही!
मंगळागौर ही एक पारंपरिक सौभाग्यदात्री देवता मानली जाते. लग्नानंतर पुढे पाच किंवा सात वर्षे विवाहित मुली श्रावणातल्या मंगळावारी हे व्रत करतात. या व्रतात शिव आणि गणपती यांच्यासह गौरीची पूजा करायची असते. नववधू पहिली मंगळागौर बहुधा माहेरी पूजते.
या पूजेसाठी इतरही काही नववधूंना बोलावतात. त्यांना वसोळ्या किंवा वशेऱ्या म्हणतात. या सर्व जणी एकत्र बसून पूजा करतात. त्या रात्री जागरण करतात. जागरण हे या व्रताचे विशेष विधान आहे. त्या रात्री आप्तेष्ट बायका व सख्या- सोयऱ्या एकत्र खेळ खेळतात, गाणी म्हणतात, उखाण्यातून नवऱ्याचे नाव घेतात. पूर्वी एखादी वशेळी झोपली, तर तपेलीच्या गळ्याला दोरीचा फास लावून तिचे दुसरे टोक तिच्या पदराला बांधत. मग "तपेलीची लांब दोरी, तपेली सांभाळ पोरी' असे म्हणून तिला जागवत.
चाळीतल्या जीवनात दर श्रावणात कुणाकडे तरी मंगळागौर असायची. एखादी नवी सून नाहीतर माहेरवाशीण आलेली- मग काय, आनंदाला पारावार राहायचा नाही. कुणाकडे का मंगळागौर असेना, साऱ्या मैत्रिणींनी मिळून झाडाची पत्री तोडायची. सोळा झाडांची सोळा सोळा पाने- रुईची पानं तोडताना कुणीतरी आवाज देणारच- "अंग, रुईचा चीक हाताला उतेल त्याची पानं सांभाळून तोडा'.... एवढ्या मोठ्या पत्रींचा ढीग साचायचा. आज मनात येतं, आपण केवढा वृक्षांचा नाश करत होतो. झाडंही भरपूर होती. फुलांची तितकीच अन् फळांची तितकीच!
मंगळागौरीच्या दिवशी सकाळी उठून फुलझाडांकडे आमचा मोर्चा! पारिजातकाची फुलं वेचता वेचता हात गळून यायचा. जास्वंदीची लालचुटुक फुलं, जुई-जाईची पांढरी शुभ्र सुगंधी नाजूक फुलं, तेरड्याची विविध रंगांची फुलं.... मधूनच आपलं वेगळेपण दिमाखानं दाखवणारा हिरवा चाफा, पांढरा चाफा! बघता बघता मोठमोठ्या टोपल्या फुलांनी भरून जायच्या.
खरंच, फुलांचं आयुष्य केवढंसं! पण सारी फुलं हसून एकमेकांशी संवाद साधायची. जणू सांगायची, "तुम्ही आमच्यासारखं आनंदी जीवन जगा.'
पूजेच्या वेळी सारी फुलं महादेवाच्या शरीरावर विराजमान व्हायची. नागाची फणी म्हणून केवड्याची पानं गुंफली जायची आणि सुंदर चौरंगावर फुलांचं देखणेपण अधिक देखणं व्हायचं. तेवढ्या सगळ्यात केवडा आपला वेगळा सुगंध दर्शवून भाव खायचा. वेगवेगळ्या रंगांचे भरजारी शालू लेवून आलेल्या नवोढ्यांच्या चेहऱ्यावर तेज असायचं. पूजेला आल्याचा सात्त्विकपणा असायचा, अन् मनोमन पूजा करायची हा भाव असायचा. त्यांनी घातलेले वेगवेगळे दागिने, केसात माळलेले गजरे सौंदर्यांत अधिक भर घालायचे. सुंदर रांगोळीनं सजलेली ती पूजा संपली, की मुलींना हळदी-कुंकू वाहायला बोलावलं जायचं.
मंद समईच्या ज्योतींनी त्या पूजेला केवढी शोभा यायची! संध्याकाळी मंगळागौरीचे खेळ खेळाताना सारं अंगण नाचू लागायचं
श्रावण आला, की ती मंगळागौर आठवते. ते बालपण डोळ्यांपुढे नाचू लागतं. तो आनंदाचा ठेवा जपून ठेवल्याचं केवढं सुख आजही वाटतंय..
महती मंगळागौरीची
गौरी म्हणजे पार्वती. हिरवाईने नटलेली वसुंधरा ही साक्षात पार्वतीच. श्रावणात तिच्या हिरव्या लावण्याला बहर आलेला असतो आणि त्यासाठी तिच्या पूजनाची परंपरा मंगळवारी सुरू झालेली आहे. एकेकाळी भारतीय स्त्रियांचे जीवन असंख्य रूढी-परंपरांनी बंदिस्त होते. त्यामुळे मंगळागौरीसारखी व्रतवैकल्ये म्हणजे त्यांच्या उत्साहाला उधाण यायचे. लग्नानंतर येणारी पहिली मंगळागौर दणक्यात साजरी केली जाते. मांगल्य, पावित्र्य आणि सुचिता यांचा त्रिवेणी संगम मंगळागौरीत आढळतो. पार्वतीसारखे जन्मभराचे अहेवपण लाभावे, पतीवरती मृत्यूची भयाण सावली पडू नये म्हणून हे व्रत साजरे करण्याची प्रथा निर्माण झाली. निसर्गातील वृक्षवेली यांचा परिचय व्हावा, त्यांच्या सहवासाने श्रावणातले हिरवे वैभव जीवनात यावे यासाठी मंगळागौरीसारख्या व्रतांचे नियोजन झाले असावे.
माहेरच्या मंगळागौरीचा थाट काही औरच असतो. सुवासिनी पहाटे उठून अंघोळ करून मंगळागौरीच्या पूजनास तत्पर होतात. श्रावणात उपलब्ध असणारी सोळा प्रकारची फुले, तांदूळ, चण्याची डाळ, जिरे सारखे सोळा दाणे, सोळा प्रकारची पत्री व पाच बिल्वदले, हळदमिश्रीत कणकेचे सोळा दिवे आणि सोळा प्रकारचे कणकेचेच देवीला अर्पण करण्यासाठी तयार केलेले अलंकार खुंट बांधून मखर करतात आणि ते लतापल्लवांनी सुशोभित करतात. शेणाने सारवलेल्या जागेत रांगोळी घालतात. आत पाण्याने भरलेला तांब्या ठेवतात. माडाच्या चुडताच्या पातीपासून इंग्रजी आठ आकाराचा सातापुता करतात. उजवीकडे गणपती तर डावीकडे अन्नपूर्णेला ठेवून दीप प्रज्वलन, अंग पूजा, पत्रीपूजा, पुष्पपूजा करतात. त्यानंतर धनपाल वाण्याचा शिवपुत्र आणि यमाकडून आपला पती शिवपुत्राचे प्राण आणणारी सुशीला यांची कथा श्रवण केली जाते. शेजारच्या सुवासिनींना वसोळ्या म्हणून आमंत्रित केले जाते. त्यांच्या पायाला भिजलेली हळद लावली जाते, डोळ्यांत काजळ घातले जाते आणि वाण म्हणून भिजलेले वाटाणे, तांदळापासून तयार केलेले अन्न पदार्थ विषम संख्येने भेट दिले जातात. संध्याकाळी हळदीकुंकू, तिन्ही सांजेला धुपारती आणि मध्यरात्र उलटेपर्यंत फुगड्यांचे नानाविविध प्रकारांचे उपस्थितीत सुवासिनींकडून सादरीकरण याद्वारे मंगळागौरीच्या व्रताला बहर येतो. नृत्य, नाट्य, गायन आदी स्त्रियांच्या अंगी असणाऱ्या कलांच्या उत्स्फूर्त सादरीकरणाला यथोचित व्यासपीठ लाभते. जेवणातील पदार्थांत मीठ पूर्ण वर्जित तर जेवणावेळी मौनव्रत पाळायचे असा रिवाज परंपरेने पाळला जातो.
मंगळागौरीची रात्र पारंपरिक फुगड्यांच्या असंख्य प्रकारांनी समूर्त होऊन जाते. गो फ विणू बाई गोफ विणू, अर्ध्या रात्री गोफ विणू...', "किस बाई किस, दोडका किस...', "आंबा पिकतो... रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो...' यासारख्या गाण्यांचे बोल आजही कानावर पडले तरी सर्व स्त्रियांच्या मनामध्ये चैतन्य, उत्साहाचे तरंग उठतात. खेळ, त्यातील गाणी, उखाणी काव्ये हा एक प्रकारचा सांस्कृतिक ठेवा मंगळागौरीला नव्या लकाकीद्वारे झळाळून उठतो.
अशी जागवू मंगळागौर...
आपल्या सर्वांना सण साजरे करण्याची आवड असते. पण मंगळागौर जागवायची वेळ आली की हौशी सासूबाईंना प्रश्न पडतो. कधी खेळ माहीत नसतात तर कधी गाणी येत नाहीत. याच आपल्या पारंपरिक खेळांची माहिती करून देण्यासाठी आमचा "अस्मिता ग्रुप' मंगळागौरीच्या खेळांचा एक कार्यक्रम सादर करतो.
"अशी जागवू मंगळागौर' या कार्यक्रमात 70 ते 80 पारंपरिक खेळ, त्यांची गाणी व साजेसे निवेदनही आहे. काही गाण्यांना आधुनिक स्वरूप देऊन कार्यक्रम अधिकाधिक रंजक करण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्येष्ठांना पुनःप्रत्ययाचा आनंद व नव्या पिढीला आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, असाच संस्थेचा प्रयत्न असतो. हा अभिरुचीसंपन्न कार्यक्रम श्रावणात आपणही अनुभवावा, हीच अपेक्षा.
(सकाळ संदर्भ सेवा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत नामदेव महाराज पुण्यतिथी