◆◆◆ संताची दिवाळी ◆◆◆
●●● दिपावली ●●●
~~~~●●●~~~~
दीपावलीला आपल्याकडे अनेक शतकांची परंपरा
आहे आणि संत साहित्यातही याचे उल्लेख ओघाने
आलेले दिसतात. देवभक्ती आणि चांगल्या वर्तणुकीची
सामान्यजनांना संथा देणा-या महाराष्ट्रातील नामवंत
संतांच्या बोलांमध्ये दिवाळीचे उल्लेख जागोजागी
आढळतात. दिवाळीचे फक्त चार-पाच दिवस आनंदात
राहून सौजन्याने वागण्याऐवजी हा धर्म नेहमीच पाळावा,
असा उपदेश संतांनी त्यांच्या साहित्यातून केलेला आहे.
दिवाळीचा लखलखाट आता बाजारात दिसू लागला
आहे. घराघरांत दिवाळीच्या खरेदीची चर्चा रंगात आली
आहे. हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात आनंददायी आणि मोठा
सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते. पुराणातील अनेक
कथांचा संबंध दिवाळीशी आहे. आनंद आणि प्रकाशाचा
सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते. या दिवाळी सणाचे
प्रतिबिंब संत साहित्यात जागोजागी पडल्याचे दिसून येते.
दिवाळीचा उल्लेख वारंवार आलेला असला तरी त्यात
पाच दिवसांच्या दिवाळीचा जो आनंद आहे, तो केवळ
तेवढयापुरता मर्यादित न राहता आपल्या जीवनामध्ये
कायमची दिवाळी कशी राहील, यासाठी संतांनी त्यांच्या
साहित्यातून मार्गदर्शन केल्याचे दिसते. जीवनामधील
आनंद केवळ पाच दिवस न राहता हा आनंद कायमचा
राहावा ही संतांची अपेक्षा दिसते. ज्ञानेश्वर महाराज
जीवनात निरंतर दिवाळी यावी यासाठी आपण जे प्रयत्न
केले ते सांगताना म्हणतात-
मी अविवेकाची काजळी।
फेडोनी विवेक दीप उजळी॥
ते योगिया पाहे दिवाळी॥
निरंतर॥
माणसाच्या जीवनामध्ये अविवेक हाच त्याच्या
दु:खाला कारणीभूत असतो. या अविवेकाची माणसाच्या
मन:पटलावर काजळी जमा झालेली आहे, ती काजळी
‘फेडून’ मी तेथे विवेकाचा नंदादीप पेटवितो. त्यामुळे अखंड दिवाळीचा आनंद मिळतो, असे ज्ञानेश्वर महाराज
सांगतात. अविवेकाचा अंधार ज्या वेळेला जीवनातून
जाईल, त्याच वेळी विवेकाचा दीप उजळेल. एकदा
विवेकाचा दीप उजळला की सद्विचारांकडे जाणारी वाट
दिसू लागेल. त्या वाटेवरून जाताना मिळणारा आनंद
खंडित होणारा नसेल. म्हणूनच ती दिवाळी ख-या अर्थाने
अखंडित राहणारी असेल. जीवनातील अज्ञानाचा
अंधकार नाहीसा व्हावा, अशी प्रार्थना विश्वात्मक देवाकडे
करताना पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
दुरितांचे तिमीर जावो।
विश्वस्वधर्म सूर्ये पाहो।
जो जे वांच्छिल तो ते लाहो।
प्राणिजात॥
दुरित याचा शब्दश: अर्थ पात जरी असला तरी येथे
अज्ञान असाच त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. दुरितांचे तिमीर
म्हणजे अज्ञानाचा अंधार जावा आणि विश्वस्वधर्म अर्थात
मानवतेच्या विचारांचा सूर्य उगवावा आणि संपूर्ण सजीव
असणारे प्राणी जे काही इच्छा करतील ती त्यांची इच्छा
पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा ज्ञानेश्वर महाराज करतात.
अज्ञानी लोकांच्या जीवनात ज्ञानाचा दीप उजळावा
यासाठी संत सतत प्रयत्नशील असतात म्हणून तुकाराम
महाराज तर ज्या दिवशी संत आपल्या घरी येतील तोच
दिवस दिवाळीचा दिवस समजावा, असे सांगताना म्हणतात-
साधू संत येती घरा।
तोची दिवाळी दसरा॥
तिथीप्रमाणे वर्षातून पाच दिवस येणारी दिवाळी
निश्चितच आनंद देणारी आहे. मात्र तुकाराम महाराज
म्हणतात की, ज्या दिवशी साधुसंत आपल्या घरी येतील,
ती तिथी कोणतीही असली तरी त्या दिवशी आम्हाला
होणारा आनंद हा दिवाळी-दस-यासारखा असतो.
साधूच्या भेटीत दिवाळीचा आनंद मिळावा, असे काय
त्यात दडलेले आहे, असा प्रश्न महाराजांना विचारला तेव्हा
महाराज सांगतात –
संत संगतीचे काय सांगू सुख।
आपणा पारिखे नाही तेथे॥
संतांच्या संगतीचे सुख शब्दात सांगता येण्यासारखे
नाही. ‘शब्देविन संवादु। गुजेविन अनुवादू। ’ अशी ती
अनुभूती असते ज्ञानेश्वर महाराज सांगतात. संतांच्या
संगतीत जड-मूड जरी आला तर तो तरुण होऊन
गेल्याशिवाय राहात नाही. तुकाराम महाराज तर सांगतात
की, देवापेक्षाही संतांची संगत महत्त्वाची आहे. देव
तुम्हाला प्रसन्न झाला तर भौतिक सुखाच्या गोष्टी देईल,
मोक्ष देईल, मुक्ती देईल. मात्र तो कधीही तुम्हाला देव
करणार नाही. संतांचे मात्र तसे नाही. संतांची कृपा झाली
की ती व्यक्ती कितीही अवगुणी असली तरी तिचा तत्काळ
उद्धार झाल्याशिवाय राहात नाही. हे सांगताना महाराज
स्पष्ट प्रमाण देतात-
आपणासारिखे करिती तत्काळ।
नाही काळ-वेळ तयालागी॥
संतांची कृपा ज्यावर होईल तो संतपदाला
पोहोचल्याशिवाय राहात नाही. संत नारदांची कृपा झाली
आणि दरोडेखोर वाल्याचे ऋषी वाल्मीकीमध्ये रूपांतर
झाले. संतांच्या कृपेने माणसाचा उद्धार झाला तर नवल
नाही, ज्ञानेश्वर महाराजांची कृपा झाली, तर रेडयाला
संतपद प्राप्त झाले. आजही पुणे जिल्ह्यातील आळे गावी
ज्ञानेश्वर महाराजांनी कृपापात्र केलेल्या रेडयाची समाधी
आहे आणि लाखो वारकरी चैत्रवद्य द्वादशीला त्याच्या
समाधी सोहळयानिमित्ताने तिथे भक्तिभावाने आपला
माथा टेकवितात. म्हणजे संतांची कृपा होते तेव्हा संपूर्ण
जीवन ज्ञानाच्या उजेडाने भरून जाते. म्हणूनच तुकाराम
महाराज म्हणतात –
दिवाळी-दसरा तोची आम्हा सण।
सखे संतजन भेटतील॥
किंवा .....
संतांनी जे विचार जगाला दिले, त्या विचारांची उष्टावळी अनुभवायला मिळणे हीच खरी माझ्या जीवनात दिवाळी आहे.
तुका म्हणे त्यांच्या घरची उष्टावळी।
मज ते दिवाळी दसरा सण॥
ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्या साहित्यात दिवाळी ही
प्रतीकात्मक उपमेय म्हणून पाहायला मिळते. मात्र आद्य
चरित्रकार नामदेव महाराज यांच्या साहित्यात मात्र प्रत्यक्ष
देवासोबतच दिवाळी साजरी केल्याची वर्णने पाहायला
मिळतात. एका दिवाळीचे वर्णन नामदेव आणि जनाबाई
या दोघांच्याही अभंगात आढळते. जनाबाई देवाला
दिवाळीचे निमंत्रण देऊन घरी आणण्यासाठी सांगताना
म्हणते –
आनंदाची दिवाळी।
घरी बोलवा वनमाळी॥
घालीते मी रांगोळी।
गोविंद गोविंद॥
आणि मग नामदेव कसे भगवान पांडुरंग
परमात्म्याच्या मंदिरात गेले आणि देवाला घेऊन घरी आले
याचे वर्णन पाहायला मिळते –
सण दिवाळीचा आला।
नामा राऊळाशी गेला॥
हाती धरोनी देवाशी।
चला आमुच्या घराशी॥
नामदेव मंदिरात गेलेले आहेत. ते देवाला घेऊन आले.
त्यांना उटणे लावले. अभ्यंगस्नान घातले. इतकेच नव्हे तर
आपल्या लुगडयाच्या पदराने देवाचे डोके पुसले याचे
वर्णन पाहायला मिळते.
पदर डोईचा काढीला।
बाळ नंदाचा पुसीला।
देवाचे लाडके भक्त म्हणून नामदेवांची ख्याती तर आहेच.
परंतु देवाशी हितगुज करणारे नामदेव महाराजांचे अनेक
अभंग पाहायला मिळतात. विठोबाच्या राज्यात आम्हाला
नित्य दिवाळीचा आनंद अनुभवाला येतो, असे सांगताना
नामदेव म्हणतात –
दिवाळीचा आनंद निरंतर जीवनात राहायचा असेल तर
संतांच्या विचारांचा उजेड आपल्यामागे पुढे दाटला
पाहिजे. त्या उजेडात केलेली वाटचाल आपला जीवनाचा
प्रवास सुखकर करील. त्यामुळे जीवनात आलेली दु:ख-
दैन्य पळून गेली नाहीत, तरी त्यांचा मुकाबला करण्याचे
सामर्थ्य आपल्याला प्राप्त होईल. दिवाळीच्या निमित्ताने
संतांच्या विचारांशी एकरूप होण्याचा संकल्प करूया.
आपणास व आपल्या परिवारास .........
दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा !!!!
( सौजन्य- प्रहार संताची दिवाळी )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा