◆◆ श्रीयाळ षष्ठी ◆◆
"शिवलीलामृत" या ग्रंथामध्ये १४व्या अध्यायात राजा
श्रीयाळश्रेष्ठ, राणी चांगुणा आणि चिलिया बाळाची कथा
दिली आहे ती पुढीलप्रमाणे ........
श्रीयाळश्रेष्ठ नावाचा एक राजा होता, तो भगवान शंकरांचा निःसीम भक्त होता, त्याची चांगुणा नावाची राणी होती. अनेक वर्ष या दाम्पत्याला मुलबाळ नव्हते. अनेक नवससायासानंतर अनेक वर्षांनी भगवान शंकर प्रसन्न झाले व त्यांनी वरदान दिले. त्यानंतर श्रीयाळ-शेठ आणि चांगुणा राणीला मुलगा झाला, त्याचे नाव त्यांनी लाडाने "चिलिया" असे ठेवले. राजा राणी आणि राजकुमार अगदी आनंदात होते. त्यांच्या धनधान्याने भरलेल्या घरी येणा-या प्रत्येकाला पोटभर आणि हवे ते जेवायला वाढले जात असे. त्यांच्याकडे येणारी कोणतीही व्यक्ती कधीच उपाशी जात नसे. आणि हे राजा-राणी आपल्याकडे येणा-या प्रत्त्येक व्यक्तीला जे हवं ते उपलब्ध करून देत असत. कधीही कोणाला न दुखावता आणि उपाशी न ठेवता त्यांची अन्नाची अपेक्षा पूर्ण करत असत.
एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं. आणि एका साधूचं रूप घेऊन त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले. श्रीयाळश्रेष्ठ राजा हा जातीने वाणी होता आणि शुद्ध शाकाहारी होता. पण ह्या साधूने "मला नरमांस हवे" अशी इच्छा बोलून दाखवली. पण श्रीयाळश्रेष्ठ राजाचा नियम होता कि दारी येणारा कोणताही वाटसरू उपाशी जाता कामा नये. मग नर-मांसाची उपलब्धता करत असताच पुन्हा एकदा साधूने मागणी केली कि मला तुझ्या बाळाचेच मांस हवे. मग मात्र चांगुणा राणीवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण अतिथी आपल्या घरून कोणी उपाशी जाऊ नये यासाठी मुलाचं धड आणि शीर वेगळं केले. एकुलत्या एक बाळाची आठवण म्हणून राणीने बाळाचं कांडण केलेलं शीर बाजूला काढून ठेवले आणि मांस शिजवले ते फक्त धडाचं. जेव्हा ते साधू पुढे आणले तेव्हा साधूच्या वेशातील भगवान शंकरांना लक्षात येतं कि चांगुणा राणीने शीर बाजूला काढून ठेवलं आहे आणि ताटामध्ये वाढून आणलेलं मांस हे फक्त धडाचं आहे. पुन्हा एकदा क्रोधीत
होऊन साधू जेवण न करता उठतात पण मग श्रीयाळ-शेठ राजा आणि राणीने त्या साधूचे पाय धरून माफी मागितली. भगवान शंकराची करुणा भाकली "भगवंताआता आमची किती परीक्षा पाहणार आहेस". मग चांगुणा राणीने ते शीर शिजवले आणि साधूच्या ताटामध्ये वाढले.
राजा-राणीने साधुपुढे हात जोडून पदर पसरून याचना केली "हे साधू आता तरी आमचं सत्त्व राख आणि हे भोजन ग्रहण कर". मग साधू वेशातील भगवान शंकर त्यांचा त्याग पाहून प्रसन्न झाले आणि म्हणाले तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे तुम्हाला काय हवा तो इच्छित वर मागा. बिचारी राणी चांगुणा पोटचं एकुलतं एक बाळ गेल्याच्या विरहाने हंबरडा फोडते आणि साधूला म्हणते कि लोक आता मला वांज म्हणतील आणि हा कलंक मला लागेल. माझा हा कलंक तुम्ही धुऊन टाकू शकता का? आणि चिलया बाळाला मोठमोठ्याने हाका मारते.आणि समोर पाहते तर काय… चिलया बाळ समोरून धावत येत आहे आणि आईला बिलगते. मग भगवान शंकर खरं रूप धारण करतात आणि त्या दोघांना दर्शन देतात. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. श्रीयाळश्रेष्ठ राजा आणि चांगुणा राणी साक्षात भगवंतांच्या दर्शनाने धन्य पावतात. भगवान शंकर मग सांगतात कि तुमची परीक्षा घ्यायला मी आलो होतो आणि तुमची भक्ती अगाध आहे. अशा या भगवान शंकर भक्ताचं म्हणजेच श्रीयाळ शेठ राजाचं राज्य फक्त दीड घटकांचं होतं. म्हणून ह्या राजाला औट घटकेचा राजा असं संबोधलं जातं.
श्रीयाळ श्रेष्ठ अर्थात शिराळशेठ ची कथा
इसवी सन १३९६ ते १४०८ पर्जन्यमान कमी झाल्याने दख्खन प्रदेशात बारा वर्षे दुष्काळ पडला होता. या दुष्काळाच दुर्गा देवीचा दुष्काळ म्हणून ओळखले जाते. विजापूरच्या आदिलशाहीमध्ये अराजक माजले होते, अन्न पाण्यावाचून लोक मृत्यूमुखी पडत होते. रयत गाव सोडून परागंदा होत होती. यावेळी शिवभक्त श्रीयाळ श्रेष्ठ या सावकाराने रयतेच्या यातना पाहून आपली सारी संपत्ती आणि धान्य कोठार मुक्त केले. त्याची हि दानशूर वृत्ती पाहून आदिलशाहने त्याला एक दिवसासाठी राजा केले. परंतु हर्षोल्हासाने औट घटकेतच मृत्यू पावला पण या औट घटकेत रयतेच्या हिताची अनेक कामे केली, तो दिवस होता श्रावण शुद्ध षष्ठी म्हणून आजही हा दिवस श्रीयाळ षष्ठी म्हणून ओळखला जातो. श्रीयाळ श्रेष्ठ चे कालौघात शिराळशेठ असा अपभ्रंश झाला, तर श्रीयाळ श्रेष्ठ शिव भक्त असल्याने शंकरोबा या ग्रामीण भाषेत ओळखला जातो त्याचेच सक्रोबा असे नामाभिधान प्राप्त झाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा